जळगाव : प्रतिनिधी
भरधाव वेगात असलेल्या वाळूच्या डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक अकरा वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.
अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये नितेशसिंग जगजितसिंग चौहान (वय ३२), पत्नी सुनीता नितेश चौहान (वय २५), व मुलगा शिव नितेश चौहान (वय ७, सर्व रा. मातापूर, ता. डोईफोडा, जि. ब-हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. तर त्यांचा मोठा मुलगा नेहालसिंग नितेशसिंग चौहान (वय ११) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्री नितेशसिंग चौहान हे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव येथील श्री गुरुसिंह गुरुद्वारा येथे पुजारी म्हणून सेवा देत होते. मूळचे मध्य प्रदेशातील मालापूर येथील असलेले चौहान हे नित्यनेमाने आपल्या गावाकडे ये-जा करत असत. शुक्रवारी सकाळी कौटुंबिक कार्यक्रमासाठी पत्नी व दोन मुलांसह दुचाकीने निघालेल्या चौहान कुटुंबाच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला. पूर्णाड फाट्याजवळ वळण घेण्यासाठी थांबलेल्या त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात आलेल्या डंपरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चौहान दाम्पत्यासह लहान मुलगा शिव यांचा जागीच मृत्यू झाला. नेहालसिंग मात्र थोडक्यात बचावला असून त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
चौहान यांचा अकाली मृत्यू जळगावमधील गुरुद्वारा समाजावर शोककळा पसरवून गेला आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ते सर्वांमध्ये लोकप्रिय होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करण्याचा निर्धार केला होता. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी व गुरुद्वारा समितीने संयुक्तपणे प्रयत्न केले होते. नियतीने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर डंपर चालकाविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


