नवी दिल्ली : प्रतिनिधी
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल येथील शैलजादेवी दिलीप निकम यांना देशपातळीवरील ‘सहकारिता विभूषण पुरस्कार २०२४-२५’ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार दि. २५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कृभको (KRIBHCO)च्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.
या वर्षी संपूर्ण देशातून केवळ दोन व्यक्तींना हा गौरव मिळाला असून, त्यामध्ये शैलजादेवी निकम यांचा समावेश असणे हे महाराष्ट्रासाठी आणि सहकार क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
पुरस्कार प्रदान सोहळ्याला कृभकोचे अध्यक्ष व्ही. सुधाकर चौधरी, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते चंद्रपालसिंग यादव, इफकोचे चेअरमन दिलीप सिंघानिया, एनसीसीएफचे चेअरमन विशाल सिंग, माजी केंद्रीय कृषी मंत्री मोहनभाई कुंडारिया, कृभकोचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. यादव यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
शैलजादेवी निकम यांचे सहकार क्षेत्रात दीर्घ योगदान आहे. त्या १९९५ ते १९९७ या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाच्या उपाध्यक्ष व संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महिला सक्षमीकरण, पारदर्शक सहकारी व्यवस्थापन व शेतकरी कल्याणावर भर दिला.


