भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील शनिमंदिर वॉर्डात राहणाऱ्या चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, जेव्हा त्यांच्या १८ वर्षीय मुलाने, वडिलांनी रागावल्याच्या कारणावरून मानसिक तणावात येत तापी नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. उडी मारण्याआधी त्याने आपल्या मित्राशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधत, “घरचे टेन्शन आहे… मी तापीत उडी घेतोय”, असे सांगितले आणि नंतर फोन बंद केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय नीलेश चौधरी (वय १८) असे या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजता तो तापी नदी पुलावर गेला. तिथून त्याने कंडारी येथील मित्र विजय बोदडे याला व्हिडिओ कॉल केला. संवादाच्या दरम्यान अक्षय रडू लागला आणि त्याने थेट नदीत उडी मारल्याचे विजयने सांगितले. पुलावर त्याचे चप्पल आणि मोबाइल आढळले. मित्राने तातडीने धाव घेतली, पण तोपर्यंत अक्षयने पाण्यात उडी घेतलेली होती. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी मोठ्या संख्येने पुलावर गर्दी केली होती. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. सहायक फौजदार युनूस शेख, शेखर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथक आणि पोहणारे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, हतनूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे तापी नदीला मोठा पूर असल्याने शोध कार्यात अडथळे येत आहेत.
भानखेडा आणि शेळगाव येथील पोलीस पाटलांना सतर्क करण्यात आले आहे. नागरिकांनी तापी नदीच्या परिसरात कोणत्याही प्रकारचा संशयास्पद हालचाल दिसल्यास भुसावळ पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अक्षयचे वडील वडापाव विक्री करून उदरनिर्वाह करतात. कुटुंब परिस्थिती बेताची असून, मुलाच्या अशा टोकाच्या पावल्यानं संपूर्ण कुटुंब हादरून गेलं आहे. रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम सुरू होती, मात्र अक्षयचा थांगपत्ता लागलेला नव्हता.


