जळगाव : शहरातील नामांकित संशोधक, सायंटिफिक रायटिंग क्षेत्रातील मानद संचालक आणि प्राचार्य प्रा. डॉ. हर्षल लिलाधर तारे यांना नुकतीच दुसरी पीएच.डी. पदवी प्राप्त झाली असून, त्यामुळे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाने ‘इको फ्रेंडली मार्केटिंग : ग्राहकांवर होणारा परिणाम’ या विषयावर सादर केलेल्या संशोधनासाठी त्यांना व्यवस्थापन आणि वाणिज्य या शाखेत पीएच.डी. पदवी बहाल केली आहे.
या संशोधनात त्यांना विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. आशिष गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात पीएच.डी. प्राप्त केली होती. त्यामुळे डॉ. तारे यांची डबल डॉक्टरेटधारक म्हणून नोंद झाली आहे.
संशोधन कार्यकाळात त्यांनी २७ पुस्तके, १०९ शोधनिबंध आणि दोन पेटंट्स प्रकाशित केली असून, त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना ‘इमर्जिंग सायंटिस्ट’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या डबल डॉक्टरेटच्या प्रवासात प्रा. डॉ. पूजा देशमुख, प्रा. डॉ. भागवत बारीक, प्रा. डॉ. किर्तीकुमार एखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधील ग्राहक व विविध कंपन्यांकडून माहिती संकलन करण्यासाठी प्रा. गायत्री बारी, लंकेश पावरा आणि सौरव घुगे यांनी मोलाचे सहकार्य केले.डॉ. हर्षल तारे यांचे हे यश जळगाव शहरासाठी अभिमानास्पद असून, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उंच शिखर गाठले आहे.



