धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव – चोपडा मार्ग हा केवळ दोन तालुक्यांना जोडणारा नव्हे, तर महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी ही एक जीवनवाहिनी ठरते. मात्र या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करूनही प्रत्यक्षात कामाच्या दर्जात अत्यंत हलगर्जीपणा दिसून येत आहे.
कालपासून पिपळे फाटा – साळवा फाटा मार्गावरील रस्त्यावर अनेक गाड्या खोल चिखलात फसल्याची दृश्ये समोर आली असून, नागरिकांना तासन्तास अडकून राहावे लागले. हा प्रकार केवळ गैरसोयीपुरता मर्यादित नसून, भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनांचे नियंत्रण सुटणे, रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होणे, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि रोजंदारीवर जाणाऱ्या मजुरांच्या वेळेची हानी ही या दुरवस्थेची गंभीर परिणामकारक रूपे आहेत.
प्रश्न निर्माण होतो की, मंजूर निधी गेला कुठे? आणि या दर्जाहीन कामांची जबाबदारी कोण घेणार?
या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही स्थितीत काहीच सुधारणा न झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून प्रशासन कोणाच्या जीवाशी खेळतंय का?
आवाज उठवण्याची वेळ आली आहे!
लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित विभागांनी तत्काळ या रस्त्याची पाहणी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.


