जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात लाच घेण्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना आता जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत (वय ३८, रा. पिंप्राळा) यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (२४ जुलै २०२५) रोजी जळगावात करण्यात आली.
तक्रारदार हे जळगाव येथील दिव्यांग समिश्र केंद्रात प्रभारी अधीक्षक पदावर काम करत आहेत. जून महिन्याच्या पगारासाठी बिल मंजूर करून पुढे पाठवण्यासाठी अधिकारी माधुरी भागवत यांनी १२ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिल्याने त्यांनी २२ जुलैला एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर खात्री झाल्यानंतर एसीबीने सापळा रचून २४ जुलै रोजी ५ हजार रुपयांची पहिली हप्त्याची लाच घेताना त्यांना पकडले.
सध्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास एसीबी जळगाव विभाग करत आहे. हि कारवाई पोलिस उपअधिक्षक श्री.योगेश ठाकूर, सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक श्री.हेमंत नागरे, सापळा पथक सुरेश पाटील (चालक), पोहेकाँ/ श्रीमती शैला धनगर.पोकाँ/ प्रणेश ठाकूर.पोकाँ/ सचिन चाटे यांच्या पथकाने केली आहे.


