मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीने निवडणुकी दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप कुठलीही कर्जमाफी होत नसल्याचे विरोधकाकडून नेहमीच टीकास्त्र सोडले जात आहे. आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. परतवाडा येथे टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला आहे. तसेच आंदोलकांकडून ‘जय जवान जय किसान’ आणि ‘शेतकरी विरोधी सरकारचा जय हो’ अशा घोषणा दिल्या जात आहे.
“आमचं आंदोलन आता सरकारच्या नियंत्रणात राहणार नाही. सरकारलाच राज्यात अशांतता हवी आहे. त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा होत नाही. काल प्रहारच्या दोनशे कार्यकर्त्याना नागपूरमध्ये अटक करून ठेवली आहे. आमच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. ज्या ठिकाणी पोलीस अधीक्षक आंदोलन करू देणार नाही त्या ठिकाणी आम्ही पुन्हा चक्काजाम आंदोलन करू,” असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात उग्र आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंदोलनावेळी भाषणात बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू. सरकारने जी समिती नेमली, त्याचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमलं म्हणून मलाही माहिती नाही. लुटलं तर कर्जमाफी द्यावीच लागेल. आता गांधीगिरी संपली आणि भगतसिंग गिरी सुरू झाली. आम्ही गुन्हे दाखल होण्यास घाबरणार नाही. हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है,” असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी येथे ही प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. काल रात्री उशिरा नागपूर जिल्ह्यातील प्रहारचे पदाधिकारी रजनीकांत आतकरी यांच्यासह प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी बच्चू कडू यांनी 8 जूनपासून आंदोलनाचे हत्यार उपासले होते. मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर त्यांचे हे उपोषण सुरू होते. सरकारच्या यशस्वी मध्यस्थीनंतर 6 दिवसांनी त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातून सात बारा कोरा करण्यासाठी पदयात्रा काढली होती.