नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभेत रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून अडचणीत सापडलेले तसेच वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्री पद काढून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्याकडील खाते हे मदत आणि पुनर्वसनमंत्री असलेले मकरंद पाटील यांच्याकडे देणार असल्याचे बोलले जात आहे. तर त्यांच्याकडील खाते माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधिमंडळ अधिवेशनकाळात विधान परिषदेत कामकाज सुरू असताना मंत्री कोकाटे हे मोबाइलवर रमी खेळताना दिसून आले होते. त्यावर विरोधकांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. कोकाटेंनी काहीही सांगितले तरी सरकारसाठी ते भूषणावह नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती.
तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या प्रकरणी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून आपण यूट्यूबची जाहिरात स्किप करत होतो, अशी सारवासारव मंत्री कोकाटेंनी केली. याचवेळी शेतकऱ्यांबाबत भिकारी असे वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना मंत्री कोकाटे यांनी शेतकरी नाही तर, शासन भिकारी असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले.
तसेच आपण काहीही चुकीचे केले नाही, असे त्यांनी सांगितले. या वक्तव्याने कोकाटे पुन्हा अडचणीत सापडले. महायुतीतील घटक पक्षांसह विरोधकांकडून मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यांची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यानंतर पक्षातंर्गत कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या बाबतीत मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे सध्या संसदेच्या अधिवेशनामुळे दिल्लीत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता तटकरे म्हणाले, कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा अथवा त्यांचे खातेबदल, याबाबत पक्षात कोणताही निर्णय झालेला नाही.
बुधवारी (दि. २३) मंत्री कोकाटे यांनी दिवसभरातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून त्यांनी नाशिकमधील निवासस्थानी आराम केला. दिवसभर घराबाहेर न पडल्यामुळे कार्यकर्त्यांची चलबिचल झाली. त्यांनी कोकाटेंच्या निवासस्थानी येऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कुणालाही भेटण्यास तसेच माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मंत्री कोकाटे यांच्या अडचणी वाढत असल्याचे निदर्शनास येताच काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून परिस्थितीचा अंदाज घेतला. काही कार्यकर्ते थेट मायको सर्कलजवळील नयनतारा इमारतीमधील घरी पोहोचले. पण, त्यांना भेटण्यास नकार दिल्याने कोकाटेंचे मंत्रिपद राहणार की, जाणार याविषयी त्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.