भडगाव : प्रतिनिधी
भोरटेक येथे एका शाळकरी विद्यार्थ्याला एसटी बसने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी घडली असून, जखमी विद्यार्थ्याला चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नाशिक येथून सोयगाव येथे जाणारी बस (एमएच१४/एमएच३७९१) ही भोरटेक गावाजवळ आली असता, शाळेतून सायकलने घरी जाणाऱ्या कुणाल किशोर वाघ (१४, भोरटेक) या विद्यार्थ्याला मागून जोरदार धडक दिली. बसच्या पुढील चाकामुळे कंबरेला आणि पायाला दुखापत होऊन गंभीर जखमी झाला आहे. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत, जखमी कुणाल वाघ याला पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच, फौजदार लक्ष्मी करनकाळ, पोलिस हवालदार रवींद्र पाटील, दत्तू पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. बस चालक हा भडगाव पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. दरम्यान, कुणाल हा तांदूळवाडी येथील या. द. पाटील माध्यमिक शाळेत शिकत असून, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याला तीन बहीणी आहेत. वडील मोलमजुरी करतात.