जळगाव : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी प्रशांत सुभाष ठाकूर (वय ४९) आणि खासगी एजंट संजय प्रभाकर दलाल (वय ५८, रा. शिवकॉलनी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. ग्रामपंचायत व सदस्यांविरुद्ध दाखल अतिक्रमण प्रकरणाच्या कागदपत्रांच्या नकला काढून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराने १६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या गावातील ग्रामपंचायत आणि सदस्यांविरुद्ध दाखल अतिक्रमणाच्या कागदपत्रांच्या नकला मिळवण्यासाठी अर्ज केला होता. तक्रारदार वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील खाते अभिलेख विभागातील सहायक महसूल अधिकारी प्रशांत ठाकूर आणि संजय दलाल यांना भेटत होते. त्यांनी नकला काढून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने २३ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
संजय दलाल याने ‘शासकीय फी व झेरॉक्सचे १४०० रुपये आणि सहाशे आमचे’ असे म्हणून लाचेची मागणी केली. सहायक महसूल अधिकारी ठाकूर यांनी त्याला लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. लाच स्वीकारल्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तपासणीमध्ये त्यांनी ८८० रुपये शासकीय शुल्क आणि १ हजार १२० रुपये लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर, सहायक उपनिरीक्षक सुरेश पाटील, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने पार पाडली