बीड : वृत्तसंस्था
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडचे माजी सहकारी विजयसिंह बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत. वाल्मीक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महादेव मुंडेंना हालहाल करून मारल्याचा आरोप विजय बांगर यांनी केला आहे. महादेव मुंडे यांच्या शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या हत्येचे फोटोही विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.
महादेव मुंडे हत्येप्रकरणात त्यांच्या पत्नीच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने एसआयटी नेमली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही SIT नेमण्याची मागणी केली होती. या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे वाल्मिक कराडचे माजी सहकारी विजयसिंह बांगर यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन महादेव मुंडेंना कुठे आणि कसे मारले याची संपूर्ण माहिती दिली.
महादेव मुंडे यांच्या शवविच्छेदनाचे रिपोर्ट माझ्या हाती आले आहेत. त्यानुसार, त्यांच्या शरीरावर 15 ते 16 खोलवर जखमा असून अमानुष मारहाण असल्याचे यात उघड होत असल्याचे विजय बांगर यांनी सांगितले. महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याचा मुलगा श्री कराड आणि त्यांचे साथीदार सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.
महादेव मुंडे घरी जात असताना कराडचा मुलगा श्री आणि त्याच्या साथीदाराने रेकी केली आणि हत्या केली. मुंडेंचा जीव जागेवर गेला नाही, तर क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या पायावर जखमा करण्यात आल्या. रेंगाळत असताना गालावर वार केला, नंतर अन्न नलिकेवर वार करण्यात आला. या सर्व जखमा खोलवर आहेत. मी खोट बोलत नाही, या फोटोत ते स्पष्ट दिसत आहे. त्यांचा जीव थोडा राहिला होता, त्यावेळी मानेवर मार देण्यात आला. किमान 20 मिनिटे मारहाण झाली, असे विजय बांगर यांनी सांगितले.
या हत्या प्रकरणात छोट्या प्लॉटच्या वादातून ‘इगो’ दुखावल्याने मारहाण करण्यात आली, असा दावाही त्यांनी केला. श्री कराड, गोट्या गित्ते आणि त्याच्या साथीदारांनी ही मारहाण केली. अमानुष मारहाण करत त्यांचे मास तोडून नेले. मृतदेह तहसील कार्यालयाजवळ अज्ञात ठिकाणी टाकण्यात आला होता. परळी पोलिस देखील यात सहभागी असतील. हत्या होत असताना पोलिस हाटकत होते.