मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना झालेल्या महाराणी नंतर आरोपी असलेले सूरज चव्हाण आणि त्यांच्यासोबतच्या 9 पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना शरण जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. सूरज चव्हाण यांच्यासह नऊ जण लातूरच्या विवेकानंद पोलिस ठाण्यात शरण आले होते. सकाळी त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली. या सर्व प्रकरणात कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यामुळे या विषयी पुन्हा एकदा वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील दोन दिवसापासून पोलिसांची दोन पथके सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या शोधात होती. या प्रकरणात 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतले होते. तर सूरज चव्हाण आणि इतर 9 आरोपी मध्यरात्री पोलिसांना शरण आले. पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. त्यानंतर सकाळी त्यांना जामीन देखील मंजूर झाला आहे. यासंबंधी घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिस उपअधीक्षक रणजीत सावंत यांनी माध्यमांना सांगितले आहे. या सर्व प्रकरणात लातूर पोलिस सूरज चव्हाण यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आता होत आहे. या सर्व प्रकरणात कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यामुळे या विषयी अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुन्हा एकदा वादंग उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याप्रकरणी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आणि मारहाण झालेले विजय घाडगे यांनी लातूर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हा सर्व बनाव असल्याचा आरोप घाडगे यांनी केला. सूरज चव्हाण यांना या सर्व प्रकरणात वाचवले जात आहे. त्यांना का पाठीशी घातले जातेय? हे मला माहीत नाही. मात्र एवढा मोठा प्राण घातक हल्ला आमच्यावर केला. माझा एखादा कार्यकर्ता या प्रकरणात दगावला असता किंवा माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर, त्याची भरपाई कोणी दिली असती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सूरज चव्हाण यांच्या पाठीशी राज्य सरकारमधील कोणीही असो. मात्र अशा पद्धतीने चुकीच्या माणसाला पाठीशी घालणे योग्य नाही. त्यामुळे आम्हाला आता प्रशासनाच्या कारवाईवर देखील शंका येत असल्याचे विजय घाडगे यांनी म्हटले आहे. मला मारहाण करताना सूरज चव्हाण याच्या हातात फायटर होते. त्याच्या हातात लोखंडी कडे होते. सूरज चव्हाण यांनी खुर्ची उचलून माझ्या डोक्यात घातली. मला जीवे मारण्याच्या उद्देशानेच ते त्या ठिकाणी आले होते, असा आरोप देखील विजय घाडगे यांनी केला आहे.