मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधि मंडळामध्ये पत्ते खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारला होता. यावेळी निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावाच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून या माध्यमातून आता तटकरे यांना छावा संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. इतकेच नाही तर त्यांना विविध फोन कॉलच्या माध्यमातून धमकी वजा इशारा देखील देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
या सर्व घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. या संदर्भात आपण स्वतः सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. सदरील घटनेचा व्हिडिओ पहा, मी अतिशय शांततेने छावा संघटनेचे निवेदन स्वीकारले होते. ते कितीही आक्रमक झालेले असले तरी मी शांत आणि संयमी होतो, असा दावा देखील तटकरे यांनी केला आहे. मात्र त्यानंतर घाडगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली असल्याची माहिती मला सुरज चव्हाण यांनी दिली, असे देखील तटकरे यांनी म्हटले आहे.
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याची माहिती मला सुरज चव्हाण यांनी दिली असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात मला अनेकदा अनेक जणांचे कॉल येऊन गेले. मी लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे संयमाने वागणे हे माझं कर्तव्य आहे. त्यानुसार मी संयमाने वागलो असल्याचेही तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे ज्यावेळी भेटतील त्यांना मारहाण केली जाईल, अशी मुलाखत देखील काही कार्यकर्ते माध्यमांना देत आहेत. असे देखील तटकरे यांनी सांगितले.