जळगाव : प्रतिनिधी
कामावरून घरी जात असलेल्या संजय सुपडू मालचे (५०, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या डोक्यात दुचाकीवरील एका जणाने बीअरची बाटली मारून दुखापत केली. याविषयी इसमाने जाब विचारला असता त्यांच्या छातीत दगड मारला. ही घटना २० जुलै रोजी रात्री बी.जे. मार्केट परिसरात घडली. रात्रीच्या वेळी मद्यपींच्या टवाळखोरीला आळा घालावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, एका हॉटेलमध्ये कामाला असलेले संजय मालचे हे काम आटोपल्यानंतर रात्री पायी घरी जात होते. ते बी.जे. मार्केटजवळ असताना एका दुचाकीवर तीन जण आले. त्यातील मागे बसलेल्याने मालचे यांच्या डोक्यात बीअरची बाटली मारली. यामध्ये मोठा रक्तस्त्राव होऊन ते रक्तबंबाळ झाले. त्यांनी जाब विचारला असता त्यांच्या छातीत दगड मारण्यात आला. अंधाराचा फायदा घेत तिघेही जण पळून गेले. या प्रकरणी संजय मालचे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण करीत आहेत.