बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर सहकऱ्यांची दोष मुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर ७ जुलै रोजी युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादानंतर देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने दोषी नसल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला होता. या अर्जावर आज न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली.
आरोपी दोष मुक्तीसाठी स्वतंत्र अर्ज करुन कोर्टाचा वेळ वाया घालवत असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आरोपींचे दोष मुक्तीचे अर्ज फेटाळण्यात आले. संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणात 4 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
वाल्मीक कराडसह सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे सादर केले होते. यानंतर आजच्या सुनावणीत सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयामध्ये जोरदार विरोध केला. ते म्हणाले, “हे प्रकरण चार्ज फ्रेम केले पाहिजे. प्रत्येक आरोपी वेगवेगळ्या दिवशी दोष मुक्तीचा अर्ज सादर करेल आणि पुन्हा न्यायालयामध्ये जाईल. यामध्ये खूप मोठा वेळ जात असून हे प्रकरण चार्ज फ्रेम व्हायला हवा आहे,” असं सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटले आहे.
मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र अद्यापही एक आरोपी मोकाट आहे.