मुक्ताईनगर : प्रतिनिधी
पुरनाड पुलाचे काम मंगळवारी आज दि. २२ जुलै सकाळी पोलिस बंदोबस्तात पुन्हा सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद करण्यासाठी आंदोलन सुरू केले. पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना अडवले आणि काहींना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काम थांबवण्याची मागणी केली.
प्रांताधिकाऱ्यांनी महामार्गाचे काम सुरूच राहील, असा ठाम पवित्रा घेतल्याने आमदार संतप्त झाले आणि त्यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले. पोलिसांनी अनेक वेळा विनंती करूनही आमदारांनी आंदोलन मागे घेतले नाही, त्यामुळे त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. उल्लेखनीय म्हणजे, इंदूर राष्ट्रीय महामार्गाच्या या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून त्यांना अद्यापही योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. हे प्रकरण आता अधिकच चिघळले आहे.