मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात हनीट्रॅपची जोरदार चर्चा सुरु असतांना आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोणत्याही परिस्थितीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावाच लागेल, असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले. इतकेच नाही तर प्रफुल्ल लोढा प्रकरणावर त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळात या प्रकरणातील मोठा मासा बसलेला असल्याचा दावा त्यांनी केला. तर एकनाथ शिंदे यांची केवळ आठच आमदार निवडून येण्याची क्षमता होती, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत राजीनामा द्यावाच लागेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. प्रफुल्ल लोढा प्रकरणावरून देखील त्यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. या आधी देखील त्यांनी चार मंत्री या प्रकरणात हनीट्रॅप मध्ये अडकलेले असल्याचा दावा केला होता.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आधीच त्यांच्या खात्याला ओसाड गावची पाटीलकी म्हटले होते. त्यामुळेच या खात्यामध्ये त्यांचे मन रमत नाही. म्हणून ते विधि मंडळामध्ये रमी खेळत बसत आहेत. मात्र, तरी देखील त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. यावर संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल, असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची काय मजबुरी आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राला सध्याच्या काळात एकही चांगला कृषिमंत्री लाभला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या आधी दादा भुसे यांचा देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काही उपयोग झाला नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
प्रफुल्ल लोढा हा छोटा मासा आहे. मोठा मासा मंत्रिमंडळात बसलेला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. प्रफुल्ल लोढा या प्रकरणाचा तपास हा महाराष्ट्र पोलिसांकडून होणे शक्य नाही. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करायला पाहिजे, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली. या माध्यमातून संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. लोढा यांचे कोणासोबत फोटो आहेत, हे महत्त्वाचे नाही. लोढा काय सांगतोय? ते जास्त महत्त्वाचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळातील मोठ्या मासा विरुद्ध लोढा कडे अनेक पुरावे ठेवलेले असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.