सातारा : वृत्तसंस्था
शहरातील बसाप्पा पेठ येथे सोमवारी दुपारी 4 वाजता एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला धारदार चाकू लावत खळबळ उडवून दिली. एक हात मुलीच्या गळ्यात होता, तर दुसर्या हाताने चाकू उगारत तो मुलीला जीवे मारण्याची धमकी देत होता. तो कोणालाही पुढे येऊ देत नव्हता. मुलीच्या गळ्यावर चाकू लावल्यामुळे बघणारे काहीही करू शकत नव्हते. त्याचवेळी पाठीमागून एकाने झडप घालून त्याला पकडले. त्यानंतर जमावाने त्या मुलाला बेदम चोप दिला.
अधिक माहिती अशी, संशयित मुलगा गेल्या काही महिन्यांपूर्वी बसाप्पा पेठेत राहत होता. त्यावेळेपासून तो अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी मुलाला समज दिली होती. त्यानंतर सुरुवातीला मुलाने मुलीला त्रास दिला नाही. मात्र, सोमवारी अचानक याप्रकरणाचा हायहोल्टेज ड्रामा सातारकरांनी पाहिला. संशयित मुलगा दुपारपासून मुलगी राहत असलेल्या बिल्डिंगखाली घुटमळत ती शाळेतून येण्याची वाट पाहत होता. मुलगी येताच मुलगा तिच्याजवळ गेला.
मुलगी घाबरून आरडाओरड करत असतानाच मुलाने धारदार चाकू काढून तो उजव्या हातात घेतला, तर डाव्या हाताने मुलीचा गळा आवळला. यामुळे मुलीला सुटका करून घेणे अशक्य झाले. चाकू पाहून मुलगी गर्भगळीत झाली. दरम्यान, अचानक आरडाओरडा झाल्याने नागरिक परिसरात गोळा झाले. यावेळी संशयित मुलगा कोणालाही जवळ येवू देत नव्हता. मुलीला चाकू लावल्याचे पाहून मुलीचे कुटुंबिय हादरुन गेले. परिसरातील महिलाही घाबरुन गेल्या.
जमाव वाढत असल्याचे पाहून मुलगा सर्वांना तेथून जाण्यास बजावत होता. सर्व जमाव व ती मुलगी मुलाला शांत होण्यास सांगत होती. मात्र संशयित मुलगा कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यादरम्यान या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना समजली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 15 मिनिटानंतर जमावातील एकाने व पोलिसांनी मुलाचा ताबा मिळवत मुलीची सुटका केली. यानंतर संतप्त बनलेल्या जमावाने मुलाची यथेच्छ धुलाई केली. या घटनेनंतर पोलिस व्हॅनमधून संशयित मुलाला तेथून उपचाराला रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सातारा शहरचे पोलिस सागर निकम, धीरज मोरे, उमेश अडागळे हे घटनास्थळी पोहोचले. संशयित मुलगा मात्र काही केल्या कोणाचे ऐकत नव्हता. त्यावेळी परिसरातील एका युवकाने बिल्डिंगच्या पाठीमागील बाजूच्या गेटवरून उडी मारली. पाठीमागून हळूच त्याने संशयित मुलाला धरताच जमाव तुटून पडला. मुलीची सुटका होताच संशयित मुलाला जमावाने तुडवला. या झटापटीत एकाच्या हाताला चाकू लागला असून, युवक जखमी झाला आहे.