चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील रामकृष्ण नगरजवळ फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ महिलेस पोलीस असल्याची बतावणी करत तिघा अनोळखी व्यक्तींनी तब्बल १ लाख ८ हजारांचे सोन्याचे दागिने फसवणूक करून लंपास केल्याची धक्कादायक घटना २० जुलैला सकाळी घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जुने विमानतळ परिसरातील नवलेवाडी येथील शोभा सीताराम देवरे (वय ६५) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शोभा देवरे या सकाळी ६.१५ वाजता दररोजप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या. सुमारे ६.४५ वाजता मालेगाव रोडवरील रामकृष्ण नगरच्या पाटीजवळ दुचाकीवरुन दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगून महिलेस तिसऱ्या व्यक्तीजवळ नेले. त्या तिसऱ्या व्यक्तीने गळ्यातील साखळी काढून दिली. तर आमच्या साहेबांनी, तुम्हीही तुमचे दागिने काढून द्या, असे सांगिले आहे.
त्यामुळे विश्वास ठेवून शोभा देवरे यांनी अंगावरील सर्व दागिने काढून दिले. यानंतर आरोपींनी एक गाठोडे देत ‘तुमचे दागिने सुरक्षितपणे कागदात बांधले आहेत’ असे सांगितले. त्यानंतर घटनास्थळावरून ते पसार झाले. काही वेळाने गाठोडे उघडल्यावर त्यात दगड निघाला. दरम्यान, देवरे यांनी आरडाओरड केल्यावर नागरिक गोळा झाले. दरम्यान, यात चोरट्यांनी सोन्याची १० ग्रॅमची ३० हजारांची वेल, सोन्याचे ५ ग्रॅमचे १५ हजारांचे टॉप्स, सोन्याची १८ ग्रॅमची ५४ हजारांची पोत व पेंडल, सोन्याची ३ ग्रॅमची ९ हजारांची अंगठी असे एकूण अंदाजे १ लाख ८ हजार दागिने घेऊन तिन्ही अनोळखी व्यक्ती पसार झाले आहेत. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात विविध कलांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.