नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारची लाडकी बहिण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेविषयी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठे विधान केले आहे. भुजबळ म्हणाले, ज्यांच्याकडे गाड्या, बंगले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना नाही. ही योजना गरिबांसाठी आहे, श्रीमंतांसाठी नाही. नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ बोलत होते.
छगन भुजबळ यांच्या या स्पष्ट विधानामुळे लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची अट अधिक स्पष्ट झाली आहे. पुढे ते म्हणाले, मी मागेच सांगितले होते की स्वतःहून त्यांनी सांगावे मी या नियमांमध्ये बसत नाही. एवढे करुनही ती मंडळी यामध्ये बसत असतील तर ते अडचणीचे होते. अजूनही गाडी बंगले असतील त्यांनी या लाडकी बहिण योजनेतून माघार घ्यावी असे आवाहन भुजबळ यांनी केले.
आतापर्यंत दिले असेल त्यांच्यावर अजून काही कारवाई होऊ नये यासाठी मी प्रयत्न करेल असेही भुजबळ म्हणाले. पोर्टल बंद नाही, मी डिटेल माहिती घेऊन सांगतो असेही ते म्हणाले. जे या नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी कृपा करून थांबावे. खरोखरच ज्यांना आवश्यकता आहे त्यांना न्याय मिळेल. पोर्टलबाबत मी मंत्र्यांसोबत बोलून घेईल, असेही छगन भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी सुरू करण्यास मान्यता दिली. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे, त्यांचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी मदत करणे, तसेच कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिकेला बळकटी देणे असा आहे.
या योजनेंतर्गत, महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ थेट त्यांच्या खात्यात (DBT द्वारे) जमा केला जातो. ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी राबवण्यात येत असून, त्यांना स्थैर्य आणि स्वावलंबन मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.