सोलापूर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कार्तिक बळीराम खंडाळे (वय 10) याचा खून त्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे (वय 38) याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यास चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. भावकीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी सकाळी जाधववाडी (ता. माढा) शिवारात बेपत्ता कार्तिक खंडाळे याचा कॅनॉलमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. त्याचा निर्घृण खून झाल्याचे समोर आले. या ठिकाणी श्वान पथक, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅब पथक यांनी भेट दिली होती. मानवतेला काळिमा फासणार्या या घटनेने अवघा जिल्हा हादरून गेला आहे. त्याचा निर्घृण खून कोणी व कशासाठी केला, याची चर्चा होत होती. तसेच आरोपीस तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती.
गुन्हा दाखल होताच सोलापूर येथील गुन्हे शाखा व टेंभुर्णी पोलिसांची पाच पथके तपास करीत होती. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह जाधववाडी शिवारात कॅनॉलमध्ये मिळून आला. तेथे दुर्गंधी पसरली होती. मृतदेहाशेजारी दोन चाकू, मोजे व रक्त लागलेला दगड मिळून आला होता. या ठिकाणी सोलापूर येथील श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब पथक यांनी भेट दिली होती. त्याचे सोलापूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अरण येथे शनिवारी रात्री शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा अजित पाटील, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, टेंभुर्णी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह इतर कर्मचार्यांनी कामगीरी पार पाडली.
कार्तिक खंडाळेच्या खून प्रकरणानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. वरिष्ठ स्तरावरून या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती. पोलिसांनी संदेश खंडाळे यास संशयित म्हणून तांत्रिक विश्लेषणाद्वारे ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना भावकीच्या वादातून घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे; मात्र नेमका वाद काय होता, हे समजले नाही.