जळगाव : प्रतिनिधी
औद्योगिक वसाहत परिसरातून मुख्य रस्त्याला लागणाऱ्या ट्रकला जळगावकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक देऊन ती विरुद्ध दिशेला जाऊन काँक्रीटच्या गटारीवर धडकली. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात रविवारी (२० जुलै) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रेमंड कंपनीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर झाला.
सविस्तर वृत्त असे कि, असताना औद्योगिक वसाहत परिसरातील एसएस ९ सेक्टरकडून एक मालवाहू ट्रक मुख्य रस्त्यावर येत असतांना गाडेगावकडून येणाऱ्या खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स ट्रकच्या चालकाकडील बाजूला केबीनवर धडकली. या धडकेवेळी ट्रॅव्हल्स चालकाने एकदम ब्रेक दाबल्याने ही ट्रॅव्हल्स विरुद्ध बाजूच्या रस्त्याकडे जाऊन काँक्रीटच्या गटारीवर धडकली. यामध्ये ट्रॅव्हल्सचे काच फुटून समोरील बाजू चक्काचूर झाली. तसेच ट्रकच्या केबिनचेही नुकसान झाले.
अपघानानंतर ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावून क्लिनरसह तो पसार झाला. ट्रॅव्हल्स विरुद्ध दिशेला गेली त्यावेळी त्या रस्त्यावर एकही वाहन नव्हते. अन्यथा वाहने असती तर मोठा अनर्थ झाला असता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी जयेश पाटील, विशाल राजपूत यांनी दिली. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स गाडेगाव येथील खासगी कंपनीतून कामगारांना ने-आण करणारी आहे. अपघातानंतर ट्रॅव्हल्समधील कामगारांना दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये पाठविण्यात आले.