जळगाव : प्रतिनिधी
रात्रीच्या वेळी महाविद्यालयाचे प्रवेशद्वार उघडून चोरट्यांनी रोख एक लाख रुपयांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा एनव्हीआर असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १८ जुलै रोजी मध्यरात्री गोदावरी आयएमआर लेखापाल विभागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, १८ जुलै रोजी गोदावरी आयएमआर महाविद्यालयाचे सर्व विभाग व मुख्य प्रवेशद्वार बंद करून अधिकारी, कर्मचारी घरी निघून गेले. त्यानंतर चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वार उघडून व आतील लेखापाल विभागाचा दरवाजा उघडून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे जमा झालेले एक लाख रुपये टेबलाचे काऊंटर व कपाटातून लांबविले.
चोरट्यांनी रोकड शोधताना कार्यालयातील फाईल व इतर दस्ताऐवज फेकले. तसेच कपाट, काउंटरचे नुकसान केले. आयएमआर महाविद्यालयाच्या लेखापाल विभागासह याच परिसरात असलेल्या गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूलच्या लेखापाल विभागातही कपाट व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एक जण बाहेर उभा राहून लक्ष ठेवत होता तर दोन जण आतमध्ये चोरी करीत होते. सर्वांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. चोरट्यांनी रोकड तर लांबविलीच शिवाय तोडफोड करून मोठे नुकसानही केले.