मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी गेम खेळता नाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड गदारोळ माजला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सरकार आणि मंत्रिमंडळावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे येड्याची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारची खरडपट्टी काढली.
एखादा आमदार चड्डी-बनियान मध्ये फिरतो, कुणी पैशाच्या बॅगा मोजतो, कुणी कर्मचाऱ्यांना मारहाण करतो आणि आता मंत्री सभागृहात ‘रमी’ खेळतात. हे लोक कुणाच्या आशीर्वादाने मंत्रिपदावर आहेत? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारे यांनी अधिवेशनाच्या खर्चावरही लक्ष वेधले. एक सेकंदाचे अधिवेशन चालवण्यासाठी 4700 रुपये खर्च होतात. ही रक्कम करदात्यांच्या खिशातून जाते. त्या खर्चातून जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा असते. पण इथे मंत्रीच गेम खेळतात, ही शोकांतिका आहे, असं त्यांनी सुनावले.
या प्रकरणावर आधीच राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंच्या व्हिडिओ ट्विट करत त्यांच्यावर टोला लगावला होता. राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतीचे प्रश्न प्रलंबित आहेत, आणि कृषिमंत्री मात्र खेळण्यात दंग आहेत. कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा, कर्जमाफी द्या,” असं रोहित पवार म्हणाले.
सत्ताधाऱ्यांचे एकामागून एक व्हिडिओ आणि वाद निर्माण होत असल्याने महायुती सरकार अडचणीत आलं आहे. आधी आमदार संजय गायकवाड यांचा मारहाणीचा व्हिडिओ, मग मंत्री शिरसाट यांचा बनियान मधील व्हिडिओ आणि आता कृषी मंत्र्यांचा गेम व्हिडिओ – यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली जात असल्याचं विरोधकांचे म्हणणं आहे.