मुंबई: वृतसंस्था
राज्यातील विधिमंडळाच्या सभागृहातच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ आज (दि. २०) सोशल मीडियावर पोस्ट केला असून, यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. “सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी,” असा सणसणीत टोला त्यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे.
या प्रकरणाने राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकारणाला वेगळे वळण दिले आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा, कर्जमाफी, आणि भावांतर योजनेची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ‘कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज’ ही आर्त हाक ऐकू येईल का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.