जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरुण परिसरातील आदित्य चौक येथे राहत्या घरामध्ये शुभांगी कुणाल नाईक (२५) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१९ जुलै) दुपारी मेहरुण परिसरात घडली. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारले, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला. तसेच जोपर्यंत सासरची मंडळी येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही व मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती.
शुभांगीचे वडील राजेंद्र भागवत वाघ (रा. पिंपळा, ता. सोयगाव) यांनी सांगितले की, सहा वर्षांपूर्वी मुलीचे लग्न झाल्यापासून तिला सासरचे मंडळी त्रास देऊन सतत छळ करीत होते. तिला माहेरील मंडळींशी बोलू देत नव्हते व येऊदेखील देत नव्हते.
आदित्य चौक परिसरातील शुभांगी नाईक या विवाहितेने दुपारी राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच विवाहितेची आई, वडील, भाऊ व अन्य नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. या ठिकाणी ते आक्रमक झाले व सासरच्या मंडळींवर प्रचंड रोष व्यक्त केला.
मध्यंतरी सासरच्या मंडळींनी शुभांगीला माहेरी आणून सोडले. त्यानंतर चारच दिवसांत तिला घेऊन गेले. तिला होणाऱ्या त्रासामुळे तिला पाठवीत नव्हतो, मात्र काही जणांनी मध्यस्थी केली व पाच वर्षाच्या मुलासाठी मुलीला पाठविले, असे विवाहितेच्या वडिलांनी सांगितले. आपली मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, असे सांगत सासरच्यांनीच तिला मारल्याचा आरोप त्यांनी केला.