पुणे : वृत्तसंस्था
देशात सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच, सामान्य ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीनंतर अखेर सरकारने नऊ कॅरेट सोन्यालाही हॉलमार्किंगची परवानगी दिली आहे. यामुळे लवकरच बाजारात नऊ कॅरेटचे प्रमाणित हॉलमार्क दागिने उपलब्ध होणार असून, ग्राहकांना आता स्वस्त दरात दागिने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
हॉलमार्किंग परवानगी मिळाल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची विविधता वाढणार असून, ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय खुला झाला आहे. नऊ कॅरेट म्हणजे सुमारे 38% शुद्धता असलेले सोनं, जे 24 कॅरेटच्या तुलनेत तब्बल 60% पर्यंत स्वस्त पडते. सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असून, त्याच वजनाचे नऊ कॅरेटचे दागिने सुमारे 38 ते 40 हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहेत.
या संदर्भात बोलताना पुण्यातील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. चे संचालक अमित मोडक म्हणाले, “ग्राहकांसाठी ही एक सकारात्मक पायरी आहे. हॉलमार्किंगमुळे दर्जाबाबत शंका राहत नाही आणि आता कमी बजेटमध्येही दर्जेदार दागिने खरेदी करता येतील.” हा निर्णय केवळ ग्राहकांनाच नाही, तर सराफ व्यावसायिकांनाही दिलासा देणारा ठरणार आहे. कारण नवनवीन ग्राहकवर्ग दागिन्यांकडे वळेल आणि मागणीमध्ये वाढ होईल. स्वस्त, दर्जेदार आणि हॉलमार्क असलेले दागिनेही आता प्रत्येकाच्या आवाक्यात येणार असल्याने, सोन्याची खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.