मुंबई: वृत्तसंस्था
विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीच्या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “ही चित्रफीत पाहून महाराष्ट्राची काय अवस्था झाली आहे, असा प्रश्न पडतो,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय संस्कृतीवर जोरदार टीका केली. जर अशा घटनांना वेळीच आवर घातला नाही, तर “भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” असा गंभीर इशाराही दिला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे म्हणाले, “सत्ता हे साध्य नसून साधन आहे, याचा विसर पडल्याने वाटेल त्या लोकांना पक्षात घेऊन त्यांचा वापर ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजीसाठी केला जात आहे. हा भंपकपणा आता जनतेच्या लक्षात आला असेल.” “तुम्ही कोणाच्या हातात महाराष्ट्र दिला आहे?” असा थेट सवालही त्यांनी राज्यातील जनतेला केला.
‘आमची कृती मराठी अस्मितेसाठी असते‘
आपल्या पक्षाच्या भूमिकेवर बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की, “जेव्हा मराठी भाषेचा किंवा मराठी माणसाचा अपमान होतो, तेव्हा आमचे महाराष्ट्र सैनिक हात उचलतात. ती कृती व्यक्तिगत हेव्यादाव्यांतून नव्हे, तर मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी असते, याचा मला अभिमान आहे.” त्यांनी आपल्या दिवंगत आमदाराने विधानभवनात एका मुजोर आमदाराला दिलेला ‘दणका’ हा देखील मराठीच्या अपमानामुळेच होता, वैयक्तिक द्वेषातून नाही, असेही नमूद केले.
राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. “अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च दीड ते दोन कोटी रुपये असतो. महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित असताना, तिजोरीत खडखडाट असताना आणि विकास निधी मिळत नसताना हा पैसा व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया का घालवायचा?” असा प्रश्न त्यांनी विचारला. महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठीच माध्यमांना खाद्य पुरवून अशा गोष्टी घडवल्या जात आहेत का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी सरकारला थेट आव्हान देताना म्हटले आहे की, “जर तुमच्यात थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल, तर स्वतःच्या लोकांवर कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका, असा स्पष्ट इशारा देखील दिला आहे.