जळगाव : प्रतिनिधी
रात्रीच्या सुमारास घराकडे पायी जात असलेल्या सैय्यद फैय्याज गयासुद्दीन (वय ५२, रा. सुप्रिम कॉलनी) या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. यातील संशयित अमन उर्फ खेडका सैय्यद रशिद (रा. सुप्रिम कॉलनी) याच्या एमआयडीसी पोलिलसांनी मुसक्या आवळल्या.
शहरातील कांद्याचे व्यापारी असलेले सैयद फैय्याज गयासुद्दीन हे दि. १२ जुलै रोजी रात्री अजिंठा चौफुलीपासून सुप्रिम कॉलनीकडे पायी जात होते. त्या वेळी एका बेकरीजवळ अमन खेकडा नामक व्यक्तीने त्यांना अडविले व चाकू काढून त्यांच्या पोटाला लावला. कॉलर पकडून शिवीगाळ करीत ‘किती पैसे आहे लवकर काढ नाही तर भोसकून देईल’, अशी धमकी दिली. सैयद यांनी प्रतिकार केला असता अमन खेकडा याने त्यांना जमिनीवर पाडून त्यांच्या शर्टाच्या खिशातील १४ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. मी येथील दादा अमन खेकडा आहे, जास्त हुशारी केली तर जिवे ठार मारेल अशी धमकी देत मारहाणही केली.
या प्रकरणी सैयद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्रीच्या सुमारास व्यापाऱ्याला लुटल्याची घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी संशयिताच्या शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे, पोकॉ नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, राहुल घेटे यांना दिल्या. त्यानुसार दि. १५ रोजी संशयित अमन उर्फ खेकडा सैय्यद रशिद हा अजिंठा चौफुली परिसरात फिरत असल्याचे समजताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. चाकूचा धाक दाखवित व्यापाऱ्याला लुटणाऱ्या संशयित अमन उर्फ खेकडा सैय्यद रशिद याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दि. १८ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास उपनिरीक्षक राहुल तायडे व पोकों निलेश पाटील हे करीत आहे.