जळगाव : प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरात हरणाचे मांस विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना बुधवारी दुपारी २ वाजता चोपडा ग्रामीण पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून हरणाचे मांस आणि दोन शिंगे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील वांगऱ्या बारेला आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून (एमपी १०, एनसी ४८५७) वैजापूर परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी येणार होते. ही माहिती वन्यप्राण्यांच्या तस्करीशी संबंधित असल्याने, तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात त्यानंतर, पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह राजू महाजन, राकेश पाटील, गजानन पाटील, विनोद पवार, चेतन महाजन, सुनील कोळी तसेच वनविभागाचे विकेश ठाकरे, वनपाल सारिका कदम, वनरक्षक बी. आर. बारेला, बानू बारेला आणि योगेश सोनवणे यांच्या पथकाने बुधवारी १६ रोजी दुपारी १२ वाजता फॉरेस्ट कंपार्टमेंट बोरअजंटी ते वैजापूर रस्त्यावर नाकाबंदी केली. या नाकाबंदीदरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांची चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे वांगऱ्या फुसल्या बारेला (वय ४८) आणि धुरसिंग वलका बारेला (वय ४५, दोघेही रा. मध्य प्रदेश) अशी सांगितली. त्यांच्या झडतीत हरणाचे दोन शिंगे आणि मांस आढळून आले, जे पोलिसांनी जप्त केले. या दोघांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.