मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी मदरशांवर लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदी-मराठी भाषेच्या वादावर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मराठी सक्तीचीच असली पाहिजे म्हटले.
तर काँग्रेसकडून अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याबद्दल राणे म्हणाले, ‘विरोधी पक्षांनी मुस्लिमांना सांगितले पाहिजे की, मशिदींमध्ये अजान पठण होते, अजानही मराठीतून झाली पाहिजे. मदरशांमध्येही मराठी सक्तीची करण्यात आली पाहिजे.”
“मराठीतून शिक्षण दिले गेले, तरच तिथे खरे शिक्षण सुरू होईल. नाहीतर तिथून केवळ बंदूकाच निघतील. महाराष्ट्रात खूप मदरसे आहेत. तिथे उर्दूऐवजी मराठी सुरू करा, त्यामुळे तुमची मेहनत कमी होईल. तुमच्या मुल्ला-मौलवींना सांगा की, चांगल्या प्रकारे मदरशांमध्ये (मराठी) शिकवा, आम्हालाही कळेल की, खरंच मदरसे शिक्षणासाठी आहेत,” असेही नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे यांच्या या विधानानंतर एआयएमआयएमचे प्रमुख खासदार ओवेसी यांनी पलटवार केला. ओवेसी म्हणाले की, “जर तुम्ही त्यांचे जुने ट्विट बघितले, तर तुम्हाला दिसेल की ते कसे तबलिगी जमातच्या संमेलनाचे स्वागत करताना दिसतील”, असा पलटलवार ओवेसींनी राणेंवर केला.