मुंबई: वृत्तसंस्था
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप मुद्द्यावरून विरोधक आज (दि. १७) विधानसभेत आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी सभात्याग करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हनी ट्रॅपबाबत माझ्याकडे पेनड्राईव्ह असल्याचा दावा करून सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी केली.
राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकेले आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हा मुद्दा मी विधानसभेत मांडला, पण सरकारने गांभीर्याने घेतलेला दिसून येत नाही. सरकार अजून उत्तर देत नाही. मला कोणाचे चारित्र्य हणन करायचे नाही. माझ्याकडे पेनड्राईव्ह सुद्धा आहे,असा दावा काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
याबाबत सरकार वास्तविक गोष्टी लपवत आहे. काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हे हानीट्रॅपला बळी पडले आहेत. या सर्वांकडून महाराष्ट्राची गोपनिय कागदपत्रे देश विरोधी लोकांच्या हाती पडलेली आहेत. काल अध्यक्षांनी निवेदन देण्यास सांगूनही कुठलंही निवेदन आलेले नाही. पुरावे आमच्याकडेही आहेत. मात्रा आम्ही कोणाच्या चारित्र्यावर बोलू इच्छित नाही. सरकारने कारवाई न केल्यास विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेसमोर या गोष्टी मांडू. ही घटना बाहेर पडल्यानंतर अनेक सीसीटिव्ही डिलिट केले जात आहे, असा आरोपही पटोले यांनी यावेळी केला.
नाना पटोले म्हणाले की, हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांचा मुद्दा काल मी विधानसभेत उपस्थित केला होता. नाशिक, ठाणे आणि मंत्रालयात हॅनी ट्रॅप झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मी मुद्दा उपस्थित केला, यावर सरकारने उत्तर देणे अपेक्षित होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही नाशिक हनी ट्रॅप प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी विधानसभेत केली. तर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत जाहीर विधान केले आहे की, आपआपसांत सेटलमेन्ट केली आहे,असे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही गंभीर दखल घेतली आहे. तर मंत्री योगेश कदम यांनी मी प्रतिक्रिया दिली ती हनी ट्रॅप प्रकरणाची नव्हती, असा खुलासा केला.
नाना पटोले यांचे आरोप फेटाळून लावताना मंत्री योगेश कदम म्हणाले की, नाना पटोले यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. ते सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. आमच्या सरकारचा कारभार पूर्णपणे स्वच्छ पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.