चाळीसगाव : प्रतिनिधी
गुटख्याची वाहतूक करताना शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नागदच्या व्यापाऱ्याचा ७लाख १९ हजार २९ रूपये किंमतीचा गुटखा पकडला आहे. वाहनासह एकूण १५ लाख १९ हजार २९ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी तीनजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहनचालक सलीम मुनीर खान (२४, ग्रीन पार्क, जारगाव चौफुली, पाचोरा), अरबाज इब्राहीम पठाण (२२, सार्वे, ता. पाचोरा) व गुटख्याचा पुरवठादार दीपक प्रविणचंद बेदमुथा उर्फ जैन (नागद, ता. कन्नड) अशी तिघा आरोपींची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप घुले, हवालदार राहुल सोनवणे, योगेश बेलदार, पोकॉ. आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, समाधान पाटील व गुन्हे शोध पथकाने बुधवारी सकाळी वाहनांच्या तपासणी करताना छोटा टेम्पो (एमएच४१/एयू३२१०) अडवला.
पोलिसांनी वाहनासह त्यातील गुटखा ताब्यात घेऊन या घटनेची माहीती अन्न व औषध प्रशासनाला दिली. अन्न सुरक्षा अधिकारी सायंकाळी चाळीसगाव आल्यावर त्यांनी जप्त गुटख्याची माहिती घेतली. सुमारे ७ लाख १९ हजार २९ रूपये किंमतीचा गुटखा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा गुटख्याचा ऐवज तसेच ८ लाख रूपये किंमतीचे वाहन असा एकूण १५ लाख १९ हजार २९ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाहनचालक सलीम मुनीर खान (२४, ग्रीन पार्क, जारगाव चौफुली, पाचोरा), अरबाज इब्राहीम पठाण (२२, सार्वे, ता. पाचोरा) व गुटख्याचा पुरवठादार दीपक प्रविणचंद बेदमुथा उर्फ जैन (नागद, ता. कन्नड) या तिघांच्या विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.