जळगाव : प्रतिनिधी
बदली होऊन एक वर्ष होत आले तरी पोलिस मुख्यालय परिसरातील शासकीय निवासस्थाने न सोडणाऱ्या पाच पोलिस अंमलदारांना मोठा दंड करण्यात आला आहे. ही रक्कम त्यांच्या पगारातून कपात केली जाणार असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत.
पोलिस मुख्यालय परिसरात शासकीय निवासस्थाने आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या इतरत्र झाल्या आहेत, त्यांना ही निवासस्थाने सोडण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली जाते. मात्र इतरत्र बदली झालेल्या पाच कर्मचाऱ्यांनी कालावधी उलटूनही निवासस्थानांचा ताबा सोडलेला नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली मुदत उलटून किती कालावधीसाठी निवासस्थान ताब्यात ठेवले आणि क्षेत्रफळानुसार दंड करण्यात आला आहे.
एका जणाला एक लाख दोन हजार २१९, दुसऱ्याला एक लाख १३ हजार ४१२ आणि तिसऱ्याला एक लाख १४ हजार ७६ रुपये दंड करण्यात आलेला आहे. इतर दोन जणांपैकी एकाला ८९ हजार ४२४ व दुसऱ्याला ५८ हजार ६९७ रुपये दंड करण्यात आला आहे. ही दंड वसुली वेतनातून कपात केली आहे.