मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने नवा डाव टाकला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे. हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणुका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत.
आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती करुन एकनाथ शिंदेंनी मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी खेळल्याची राजकीय चर्चा सध्या सुरु झाली आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने त्यासाठी कंबरही कसली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधाती महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. युतीबाबत एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर हे दोन्ही प्रमुख नेते संयुक्त पत्रकारपरिषद घेत बुधवारी दुपारी घोषणाही करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मतांची जुळवाजुळव आणि पक्ष मजबूत करण्यासाठी शिंदे गटाचे देखील प्रयत्न सुरु झाल्याचे म्हंटले जात आहे.