मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. मात्र जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताच एका दिग्गज नेत्याकडून त्यांना महायुतीसाठी ऑफर देण्यात आली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर दिली आहे. “जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुती सोबत आले पाहिजे. जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांना विकास करायचा असेल तर सत्तेसोबत आलं पाहिजे. राष्ट्रवादी सोडणार असाल तर मी मध्यस्थी करून त्यांना महायुतीत आणायला तयार आहे”, असे रामदास आठवले म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा सुरू होती. जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. या आधीच्या एका कार्यक्रमात त्यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावे आणि नव्या लोकांना संधी द्यावी अशी जाहीर मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चाही सुरू झाली. त्यानंतर अखेर पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे.