यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील पाडळसे आणि भोरटेक परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याच्या चर्चाना आता पुष्टी मिळत आहे. मंगळवारी पहाटे भोरटेक गावाजवळ शेतकरी भास्कर रमेश कोळी यांच्या गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून एका म्हशीला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात वाघाच्या अस्तित्वाची चर्चा होती. वनविभागाच्या मते हा बिबट्या असावा, असे म्हटले होते तर काही ग्रामस्थांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर पाडळसे येथील पोलिस पाटील, सुरेश खैरनार यांनी वन विभागाला माहिती दिली.
यावल पूर्वचे वनक्षेत्रपाल एस. एम. पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकठोरा वनपाल आय. एस. तडवी, फैजपूर वनपाल अतुल तायडे, गस्तीपथक वनपाल आर. एम. जाधव, वनरक्षक गणेश चौधरी, वनरक्षक आय. बी. चव्हाण, वाहन चालक वाय. डी. तेली यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने पावलांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा केले असून, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.