जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील मुकुंदनगर येथील लाठी शाळेच्या मागे असलेल्या मानेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येणारे चांदीचे मुकुट व अन्य दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या मंदिरासमोर राहणारे अरुण लक्ष्मण शेटे हे मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर वापरण्यात येणारे सुमारे ६१,५०० रुपयांचे चांदीचे मुकुट आणि इतर दागिने घरी सुरक्षित ठेवत असतात. हे दागिने सण, उत्सवाच्या दिवशीच मंदिरात नेऊन वापरण्यात येतात. शेटे कुटुंबीय पुण्याला मुलाकडे गेल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडून हे दागिने चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली. या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०८/२०२५ भा.दं.वि. (BNS) कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) अंतर्गत दि. ११ जुलै २०२५ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखालील तपास पथक गठीत करण्यात आले. या पथकात पो.ह.प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, रतन गीते, गणेश ठाकरे, नितीन ठाकूर व राहुल घेटे यांचा समावेश होता.तपासादरम्यान परिसरातील तसेच मंदिरासमोरील रस्त्यावरील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून दोन संशयितांचे चेहरे स्पष्टपणे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी शकीब शेख ताजुद्दीन शेख (वय २४, रा. कासमवाडी, रोकडे कॉम्प्लेक्सजवळ, प्लॉट नं. १०, जळगाव) आणि राहुल शेखर रावळकर (वय ३२, रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव) यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास कार्यवाही पोनि बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ. गिरीश पाटील व पोकॉ. योगेश घुगे करीत आहेत.