मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. या हल्ल्याला प्रवीण गायकवाड यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळेच आज मी जिवंत आहे. अन्यथा माझ्या जिवावर हल्ला झाला होता, याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
प्रवीण गायकवाड म्हणाले, हा माझ्या एकट्यावर झालेला हल्ला नाही, कारण मी गेल्या 30 वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करत आहे, हा मराठा समाजावर झालेला हल्ला आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना काळे फासण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. हा माझ्यावर नाही, तर पुरोगामी विचारांवर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले, शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काळे वंगण तेल टाकले, माझ्यावर हल्ला केला, मला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही जी विचारधारा आहे, डॉ. पानसरे, कलबुर्गी, दाभोळकर यांचा खून झाला. गौरी लंकेश यांचाही खून झाला, सध्याच्या सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत.
कधी पक्ष फोडले जातात, पक्षानंतर कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो. आमचा विचार हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला विचार आहे. संभाजी ब्रिगेडचा काम चालूच राहणार आहे, पण हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी याचा निषेध करणार नाही. मात्र, ज्यांनी हे घडवून आणलंय ही शेवटाची सुरुवात आहे एवढच सांगतो, असेही प्रवीण गायकवाड यांनी यावेळी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, ज्यावेळी मी या कार्यक्रमाला पोहोचल्यानंतरही कुठलीही पोलिस यंत्रणा याठिकाणी नव्हती. मला असे वाटते की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा नव्हती का? काही ठरवून षड्यंत्र होते का? आज मी माझ्या बहुजन कार्यकर्त्यांमुळेच जिवंत आहे.