पुणे: वृत्तसंस्था
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी नेत्याकडून त्यांच्याबाबत अनेक विधान होत असतांना आता पुन्हा एकदा अजित पवारांनी सूचक विधान केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
जयंत पाटील हे वरिष्ठ नेते असून, त्यांनी सात वर्षे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले आहे. नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा त्यांचा विचार असू शकतो. तसेच राष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचाराजीनामा दिला असावा, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केले. त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. बारामती होस्टेल येथे रविवारी (दि.13) पुणे व पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते.
पवार म्हणाले, जयंत पाटील आणि मी अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. आमची ही आठवी टर्म आहे. इतकी वर्षे एकत्र काम केल्यामुळे आमचे संबंध आहेत. आमची राजकीय भूमिका वेगळी आहे, हे जगजाहीर आहे. त्यांनी कोणत्या हेतूने राजीनामा दिला, हे मला माहीत नाही आणि ते विचारण्याचा मला अधिकारही नाही. मात्र पुढच्या आठवड्यात भेटलो तर राजीनामा देण्याचे कारण नक्की विचारणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील खासदार संदिपान भुमरे यांच्या नातेवाईकाच्या दारू दुकानाचा परवाना एका दिवसात स्थलांतरित झाल्याच्या प्रकरणावर बोलताना पवार म्हणाले, अंतिम सही राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मंत्री म्हणून माझी असते. अशा कामांबाबत मी तत्परता दाखवणार नाही. जनतेला काही अडचण होत असेल, तर त्यात सर्वस्व पणाला लावतो. ही 2023 ची घटना आहे. यावेळी पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांना फोन करून विचारणा केली. त्यावेळी देशमुख यांनी हे प्रकरण 2023 चे असून एका दिवसात परवाना हस्तांतरित झाला नसल्याचे सांगितले. बेकायदेशीर कामे केली जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.