जळगाव : प्रतिनिधी
शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याने अनंत कचरु हातांगडे (वय ३२, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणाला तिघांनी लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना दि. ११ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास नवनाथ मंदिराजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हरिविठ्ठल नगरातील नवनाथ मंदिराजवळ अनंत हातांगडे हे वास्तव्यास असून ते मजूरी करतात. दि. ११ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित बापू कोळी, कपील सुतार व युगल सुतार हे हातांगडे याच्याघरासमोर जोरजोरात शिवीगाळ करीत होते. त्यावेळी तरुणाने त्यांना शिवीगाळ का करता असा जाब विचारला. त्याचा राग आल्याने त्या तिघांनी अनंतर हातांगडे या तरुणासोबत वाद घालून त्याला शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी संशयित बापू कोळी याने लाकडी काठीने तरुणाला मारुन गंभीर जखमी केले. दरम्यान, तरुणाने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित बापू रविंद्र कोळी, कपील गणेश सुतार, युगल सुतार (तिघ रा. हरिविठ्ठल नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर हे करीत आहे.