जळगाव : प्रतिनिधी
वाढदिवस साजरा केल्यानंतर खांबावरील तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करणाऱ्या गोविंदा मुरलीधर बाविस्कर (१८, कांचननगर) व संजय नाना सौदागर (१९, मूळ रा. शेंदुर्णी, ता. जामनेर, ह. मु. अष्टभूजा चौक, कांचननगर) यांना रविवारी ताब्यात घेत त्यांची धिंड काढण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, गोविंदा बाविस्कर या तरुणाचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्या मित्रांनी मध्यरात्री केक कापला. त्यानंतर टवाळखोरांनी खांबावर लावलेले शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे दगड मारुन फोडले. याबाबतची माहिती नेत्रमकडून शनिपेठ पोलिसांना कळविण्यात आली. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कॅमेरे तोडणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तसेच परिसरात दहशत माजविणाऱ्या व कॅमेऱ्यांची तोडफोड करणाऱ्या गोविंदा बाविस्कर व संजय सौदागर यांची परिसरातून धिंड काढली.