जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर येथे दुचाकीला कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात पहूर कसबे (ता. जामनेर) येथील माहेरवाशीण प्रीती तुकाराम गीते (४३, रा. पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) या ठार झाल्या. त्या द्वारदर्शनासाठी माहेरी येत होत्या. ही घटना पहूर ते पाचोरा रस्त्यावर रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, पती-पत्नी दुचाकीने पहूर येथे व्दारदर्शनासाठी येत होते. पहूर गाव दोन किलोमीटर अंतरावर असताना पहूर-पाचोरा रस्त्यावर दुचाकीला कुत्रा आडवा आला. काही कळण्याच्या आत पती-पत्नी जमिनीवर कोसळले. कोसळल्यावर प्रीती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी पती-पत्नीला पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणि तिथून पुढील उपचारासाठी जळगावला नेत असताना वाटेत प्रीती यांचा मृत्यू झाला. प्रीती यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.