तिरुवल्लूर : वृत्तसंस्था
देशातील तामिळनाडूतील तिरुवल्लूरजवळ रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग लागल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या आगीत 4 ते 13 टँकर वॅगन्स जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रविवारी पहाटेच्या सुमारास ही मालगाडी तिरुवल्लूर स्थानकाजवळून जात असताना अचानक एका वॅगनमध्ये आग लागली. ही आग काही वेळातच अन्य डिझेल टँकरपर्यंत पसरली आणि आगीचे लोट व धुराचे गडद वलय परिसरात पसरले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे चेन्नई-अरक्कोनम रेल्वेमार्गावरील विद्युत पुरवठा तातडीने बंद करण्यात आला, ज्याचा परिणाम थेट उपनगरी रेल्वे सेवांवर झाला आहे. दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई सेंट्रल येथून सुटणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत.