जळगाव : प्रतिनिधी
शहरातील आर.आर.विद्यालयामध्ये कल्पेश वाल्मीक इंगळे (१५, रा. रचना कॉलनी) या विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी त्याच्या वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका यांनी दिशाभूल केली असून, त्यांच्याविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. कल्पेशच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आर. आर. विद्यालयामध्ये कल्पेश इंगळे या विद्यार्थ्याचा शुक्रवारी (११ जुलै) मृत्यू झाला. त्याला अन्य मुलांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. तसेच शाळेच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली. त्यानुसार शुक्रवारी रात्रीच कल्पेशच्या वर्गशिक्षिका, चार ते पाच वर्गमित्र यांना पोलिसांनी बोलावून त्यांचे जबाब घेतले. तसेच याप्रकरणी मुलाचे वडील वाल्मीक भाऊराव इंगळे (४३) यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी वर्गमित्राला ताब्यात घेत बालन्यायमंडळासमोर हजर केले आहे. त्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.