मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असून आता न्यायालयात लढाई लढणार आहे. आम्ही कुठेही चुकीच केलेलं नाही. त्यामुळे न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळेल, असा विश्वास आहे. ही लढाई मीच जिंकणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिली. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलावात रोहित पवार यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
राहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नाबार्डने जो रिपोर्ट केला होता, त्यात १०० लोकांची नावे घेतली होती. तर ईडीने एफआयर केला त्यात ९७ लोकांची नावे आहेत. त्यात माझ नाव नाही. मी कारखाना घेतला तेव्हा तिथे कोणाताही राजकीय व्यक्ती बँकेच्या बोर्डात नव्हता. तिथे माजी अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यांनी टेंडर काढल्यानंतर बारामती अॅग्रोने घेतले होते. ९७ लोकांना बाजूला ठेवून माझ्यावर राजकीय दृष्टीकोनातून कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ नाव एफआयआरमध्ये नसताना नाव घालण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याआधी ईडीकडून झालेल्या चौकशीत सर्व माहिती दिली आहे. कारखाना अजूनही माझ्या ताब्यात आहे. शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. ईडीने चार्जशीट फाईल केली कारण त्यांना मर्यादित वेळेत चार्जशीट फाईल करायची असते. आता आम्हाला न्याय मागण्यासाठी न्यायालयात लढाई लढावी लागणार आहे. ही लढाई मीच जिंकणार आहे. आम्ही पळणारी लोक नाही, तर लढणारी लोक आहे. इतर लोक पळून गेले, पण आम्ही पळून जाऊन लाचारी स्वीकारणार नाही. एफआयरमध्ये जी ९७ लोक आहेत ती भाजपसह एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात आहेत. ती लोक सत्तेत आहेत आणि आम्ही विरोधात असल्याने कारवाई केली जात आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.