जळगाव : प्रतिनिधी
आर.आर. विद्यालयामध्ये कल्पेश वाल्मीक इंगळे (१५, रा. कासमवाडी) विद्यार्थ्याचा या मृत्यू झाला. शाळेत चक्कर येऊन पडल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे शाळेचे म्हणणे आहे तर त्याला अन्य मुलांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ही घटना शुक्रवारी (११ जुलै) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, मात्र घटनास्थळ त्यात येत नसल्याचे आढळून आले. कासमवाडी परिसरातील वाल्मीक इंगळे यांची एमआयडीसीत हॉटेल असून कल्पेश हा त्यांचा मोठा मुलगा होता.
सविस्तर वृत्त असे कि, कल्पेशचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याचे शिक्षक सांगत असले तरी त्याच्या कपड्यावर मातीही लागलेली नाही. मुलाचा मृत्यू चक्कर येऊन नाही तर त्याला अन्य विद्यार्थ्यांकडून मारहाण झाली व त्यात त्याचा मृत्यू झाला, असा आरोप कल्पेशच्या आजी वत्सला सोनवणे यांनी केला. आर. आर. विद्यालयात जिल्हा परिषदेची चौकशी समिती आलेली होती. मुख्याध्यापक त्यांच्यासोबत होते. त्याच वेळी बाहेर ही दुर्दैवी घटना घडली.
शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत आला होता. दुपारी ३ वाजता शाळेच्या मधल्या सुटीत शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसोबत खेळताना तो अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. शिक्षकांनी त्याला जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. दोन दिवसांपूर्वीसुद्धा शाळेत वाद झाला होता व याविषयी कल्पेशने घरी सांगितले होते. आता पुन्हा वाद झाला व त्याला मारहाण करण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.