जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन असताना पदाचा गैरवापर करत, त्यांच्याच ‘श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ’ या संस्थेला १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवले आहे. धुळे जिल्ह्याच्या सहकारी संस्थांचे उपनिबंधक मनोज चौधरी यांनी हा अहवाल शुक्रवारी विभागीय सहनिबंधकांना सादर केला. धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील एस. जी. पाटील यांनी २४ जानेवारी २०२५ रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. देवकर हे जिल्हा बँकेचे चेअरमन असतानाच ‘श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ’ या संस्थेचेही अध्यक्ष होते.
बँकिंग नियमांनुसार, कोणत्याही संचालकाला किंवा त्यांच्याशी संबंधित हितसंबंध असलेल्या संस्थेला कर्ज देण्यास प्रतिबंध असतानाही, देवकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांच्या संस्थेसाठी १० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला होता.
चौकशी अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा बँकेने श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाला ६ मार्च २०२१ रोजी ७०० लाख रुपये आणि १३ जून २०२२ रोजी ३०० लाख रुपये असे एकूण १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. विशेष म्हणजे, या कर्जाची परतफेड नियमितपणे सुरू असून सहाः स्थितीत संस्था थकबाकीदार नाही, असे अहवालात नमूद आहे. नाबार्डच्या तपासणी अहवालानुसार, हे कर्ज देताना ‘बैंकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९’ च्या कलम २० चे सरळ उल्लंघन झाले आहे. या कलमानुसार, बँकेच्या चेअरमनने स्वतःच्या किंवा संबंधित हितसंबंध असलेल्या संस्थेला कर्ज देणे बेकायदेशीर ठरते. बँक आणि कर्जदार संस्था या दोघेही एकाच व्यक्तीच्या नियंत्रणाखाली होते, ही बाब चौकशीत ठळकपणे समोर आली आहे. यामुळे बँकेने नियमांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते.