मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषेवरून मोठा वाद सुरू असून, सिनेसृष्टीतील अनेक कलाकार याविषयी मत मांडताना दिसत आहेत. या वादावरून बॅालीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने भाष्य केले आहे. मुंबईत केडी: द डेव्हिल या दाक्षिणात्य चित्रपटाच्या ट्रेलर लॅान्स सोहळ्यात तिने यावर आपले मत मांडले आहे. माध्यमांसोबत बोलताना एका पत्रकाराने तिला महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादावर प्रश्न विचारला होता.
मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि मला मराठी येते, असे उत्तर शिल्पाने दिले. तिने दिलेल्या या उत्तरामुळे सगळेजण तिच्याकडे पाहतच राहिले. तसेच सिनेमाला कोणतीही भाषा नसते, सिनेमा हीच भाषा असे सांगायला देखील शिल्पा विसरली नाही. आम्ही आज केडीबद्दल बोलायला आलो आहोत. कोणताही वाद वाढवायचा नाही. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे, आणि आम्ही तो मराठीतही डब करू शकतो, असे देखील ती म्हणाली.
या चित्रपटाच्या ट्रेलर लॅान्च सोहळ्याला चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. केडी: द डेव्हिल हा चित्रपट जरी मूळ कन्नड चित्रपट असला तरी या चित्रपटात बॅालीवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. संजय दत्तचा दमदार लूक पाहून चाहत्यांच्या मनात या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
चित्रपटातील त्यांच्या भूमिका आणि चित्रपटाविषयी शिल्पा शेट्टी आणि संजय दत्त दोघांनीही विविध मुद्द्यावर भाष्य केले. या चित्रपटात ध्रुव सर्जा, संजय दत्त, शिल्पा शेट्टी, नोरा फतेही, रमेश अरविंद आणि व्ही. रविचंद्रन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.