मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी भाषा बोलावीच लागेल. महाराष्ट्र मध्ये राहून मराठी भाषेचा अपमान कोणी केला तर सहन केले जाणार नाही. अशा शब्दात राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा एल्गार पुन्हा एकदा केला होता. त्यासाठी त्यांनी 20 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एका व्यासपीठावर येत सभा देखील घेतली. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. यासंदर्भात प्रहार पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथे सातबारा कोरा यात्रेला भेट दिली. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन या यात्रेस पाठिंबा जाहीर केला आहे. यासंबंधी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट देखील करण्यात आली आहे.
या पोस्टमध्ये मनसेने म्हटले आहे की, ‘शेतकरी कर्जमाफी करू असे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलेल्या आणि सत्तेत आल्यावर विसर पडलेल्या सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी काढण्यात ऐक्याला “७/१२ कोरा यात्रा” यात्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी मनसे नेते श्री बाळा नांदगावकर यांनी बच्चू कडू यांची लाखखिंड ता. दारव्हा येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.’
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे,’ या निर्धाराने भर पावसातही प्रहार पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी ‘7/12 कोरा करा’ यात्रेला आक्रमक सुरुवात केली आहे. 7 जुलैला सुरू झालेली ही यात्रा पदयात्रा नसून, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुकारलेले निर्णायक आंदोलन असल्याचा दावा कडू यांनी केला आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह दिव्यांगांना दरमहा 6 हजार रु. मानधन, मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देणे यासह एकूण 17 मागण्यांसाठी आता 7/12 कोरा करा पदयात्रेच्या निमित्ताने निकराचा लढाच सुरू केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
निवडणूक जाहीरनाम्यात देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीसह त्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा केला जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, सरकारला या आश्वासनाचा विसर पडला. शासनाला आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी समितीची स्थापना केली जाईल, तसेच इतरही मागण्यांचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. आता समितीची स्थापना कशासाठी यात्रेदरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘लाडकी बहीण’ योजना आणताना समिती स्थापन न करता सरकारने निर्णय घेतला, मग कर्जमाफी, 7/12 कोरा करण्यासाठी समिती कशाला, असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी सातबारा कोरा संदर्भात घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली.